पुणे येथील शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातील वकिलांच्या सोसायटीसमोरील चिंचेच्या झाडला तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं….
शनिवार दिनांक ८ : पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने पत्नीची ओढणी घेऊन तिच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी समोर आला आहे.सोहेल येणीघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांची सोसायटी आहे. या कार्यालयाजवळील चिंचेच्या झाडाला फाशी घेण्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दुसरा शनिवार असल्याने न्यायालयाला सुट्टी होती. त्यामुळे रिमांड केस साठी मोजके लोक न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. सुट्टीच्या कोर्टाच्या कामापुरते लोक न्यायालयाच्या आवारात होते.
सोहेल येणीघुरे हा आपल्या पत्नीसह न्यायालयात आला होता. त्याच्यात घरगुती कारणावरुन भांडणे झाले. या भांडणातून राग अनावर झाल्याने सोहेल याने पत्नीच्या अंगावरील ओढणी ओढून घेतली व तो सोसायटी कार्यालयासमोर असलेल्या जुन्या मोठ्या चिंचेच्या झाडावर चढला. त्याला अडविण्याचा प्रयत्न पत्नीने केला. परंतु, तिला झाडावर चढता आले नाही. तोपर्यंत सोहेल याने ओढणीने गळफास घेऊन उडी मारली. त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. लोक धावत येईपर्यंत सोहेल याने फाशी घेतली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.