पुणे–मंचर थेट PMPML बससेवा पुन्हा सुरू करण्याची भाजपा नेते प्रमोदजी बाणखेले यांची मागणी

[ngd-single-post-view]

मंचर : पुणे–भोसरी–चाकण–राजगुरुनगर–मंचर या मार्गावर कोरोना काळापासून बंद अथवा मर्यादित झालेली PMPMLची थेट बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी भाजप पुणे जिल्हा (उत्तर) उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी PMPMLच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, राजगुरुनगर आणि मंचर परिसरात शिक्षण, रोजगार व औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. या भागातून दररोज हजारो विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. त्यामुळे पुणे–मंचर थेट बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चाकण MIDC परिसरात काम करणाऱ्या हजारो कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची गरज असून, थेट बससेवेमुळे प्रवासाचा वेळ व खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच खासगी वाहनांची संख्या कमी झाल्यास वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यासही हातभार लागेल, असा दावा करण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करून प्रवाशांचा प्रतिसाद तपासावा, सकाळच्या वेळेत विद्यार्थी व कामगारांसाठी तसेच संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत पुरेशा बसफेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या मार्गाचे प्रवासी सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार बसफेऱ्यांची संख्या वाढवावी, अशा मागण्या बाणखेले यांनी केल्या आहेत.

या मागणीवर PMPML प्रशासन काय निर्णय घेते, याकडे मंचर, राजगुरुनगर, चाकण व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Websites Views :

page counter