शिरूरच्या गोपाळवस्तीत हातभट्टी दारूविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई; १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक

[ngd-single-post-view]

 

प्रतिनिधी – श्री-योगेश भाऊ लंघे पाटील 

शिरूर : शिरूर शहरातील मार्केट यार्डसमोरील गोपाळवस्ती परिसरात गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व अवैध विक्रीविरोधात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तयार गावठी दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन असा एकूण १ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

शिरूर पोलिसांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपाळवस्ती, मार्केट यार्डसमोरील परिसरात ही कारवाई केली. पोलिसांना विविध ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तसेच तयार दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुद्देमाल जप्त केला.

चार आरोपींना अटक

या प्रकरणात नंदा जनार्दन पवार (वय ५०), मीना युवराज गव्हाणे (वय ३५), राहुल विश्वनाथ पवार (वय ३५) आणि सुभाष विश्वनाथ पवार (वय ४४, सर्व रा. गोपाळवस्ती, शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय कविता किरण पवार, कमल जयसिंग गव्हाणे, सतीश जयसिंग गव्हाणे, सरस्वती पवार, सविता राजकुमार गिरे, संजय छबुराव जाधव, रमेश छबुराव जाधव, राजेंद्र छबुराव जाधव आणि उमेश संजय जाधव या अन्य नऊ आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(क), ६५(फ) आणि ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले आणि पोलीस पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार टेंगले (बक्कल क्रमांक २४९९) यांनी केली.

— पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या प्रसिद्धिपत्रकावर आधारित वृत्त


Websites Views :

page counter