भिमाशंकर , जि. पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना वृद्धिंगत करण्यासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे शिबिर दिनांक १० मे ते १२ मे २०२५ या कालावधीत भिमाशंकर परिसरात पार पडले.
या शिबिरात करिअर मार्गदर्शन, बौद्धिक खेळ, मैदानी खेळ, ट्रेकिंग, ट्रेझर हंट, वादविवाद, ओपन माईक, ग्रामीण जीवनाचा अनुभव, नेतृत्व विकास कार्यशाळा, इतिहास व महापुरुषांच्या विचारांची सत्रे, मशाल सत्र, तसेच विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ यावर आधारित चर्चासत्र अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व सत्रांमधून विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व व चारित्र्य निर्माणावर भर देण्यात आला.
आजच्या तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता, मानसिक आरोग्याची समस्या जसे की डिप्रेशन व चिंता, तसेच मोबाईलचे व्यसन या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणी आणि जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
या शिबिरात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर या भागांमधून एकूण २४५ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते, अशी माहिती जिल्हा संयोजक साहिल ढमढेरे यांनी दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.