राजगुरुनगर : खेड तालुक्यातील चांडोली गावच्या हद्दीत टेकडीच्या कडेला, वीटभट्टीजवळ सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर खेड पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चांडोली गावाच्या हद्दीत तीन पत्ती नावाचा जुगार पैशांवर सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पंचांना सोबत घेऊन पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यावेळी धनलेश अशोक जाधव, किशोर मारुती टेमकर, धसराज जानमोहमद खान, प्रताप इशा खान, उमेद उद्दीन मुजावर आणि विश्वनाथ बबन फावडे हे सहा जण तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडून अनुक्रमे रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच ३४ पत्त्यांचा संच व इतर जुगाराचे साहित्य मिळून आले. जप्त रोख रक्कम व साहित्याची एकूण किंमत १४,७५० रुपये असल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष वामन घोलप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.



