उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्यावर गुन्हा दाखल….

[ngd-single-post-view]

उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्यावर गुन्हा दाखल….

पुणे प्रतिनिधी : बाणेर येथील औंध-बाणेर डी.पी. रोडवरील ताम्हाणे चौकातील कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे एक एकर जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उद्योजक प्रकाश रसिकलाल धारिवाल यांच्यासह ११ जणांवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने संबंधित जमिनीवर ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही पहाटेच्या वेळी शस्त्रसज्ज टोळीच्या मदतीने जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी ओमकार संजय ताम्हाणे (वय २८, रा. समर्थ कॉलनी, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रकाश धारिवाल, प्रशांत मांडेकर, मिलिंद कोठाडिया यांच्यासह सुकेशनी बनसोडे, सुप्रिया पांचाळ, सना मोहम्मद शेख, कोमल शिंदे, जन्नम मोहम्मद शेख, उमा सुनील पवार, अर्चना ओव्हाळ आणि दीपा पिंटू विल्यम यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय २५ ते ३० अनोळखी महिला आणि पुरुषांचाही गुन्ह्यात समावेश आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील सर्व्हे क्रमांक १८९ ते १९२ मधील वादग्रस्त जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालयाने संबंधित पक्षांना जागेवर कोणताही हस्तक्षेप न करण्याचे तसेच विद्यमान स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपींनी मोठ्या संख्येने लोकांना एकत्र आणून जेसीबी आणि इतर साधनांसह जागेवर प्रवेश केल्याचा आरोप आहे.

 

फिर्यादीनुसार, जागेभोवती अनधिकृतपणे पत्र्याचे कंपाउंड उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. याला ओमकार ताम्हाणे आणि त्यांच्या भावाने विरोध केला असता त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ३२४(५), १८९, १९०, १९१, ११८(१), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Websites Views :

page counter