📰 पुण्यात खून, बीडमध्ये विल्हेवाट! आवेजच्या हत्येचे ‘कुरुळी टू धर्मापुरी’ कनेक्शन उघड
पुणे, प्रतिनिधी : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका मातेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या सहा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडलेल्या या प्रकरणाने पुणे आणि बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसरिन मेहबूब शेख (वय २७) हिचे राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. तिचा मुलगा आवेज मेहबूब शेख (वय ६) हा या संबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून आरोपींनी ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संगनमताने भयानक कट रचला.
आरोपींनी चिमुकल्या आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले. त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
🟥 नैसर्गिक मृत्यूचा बनाव
हत्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आवेजचा मृतदेह अर्टिगा गाडीतून धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेण्यात आला. तेथे नातेवाईकांना मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे खोटे सांगण्यात आले.
मात्र, फिर्यादी इसाक अहमद शेख (वय ४९) यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
🟥 पोलिसी चौकशीत फुटले बिंग
शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष आणि आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी बसरिन शेख हिची कसून चौकशी केली. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी महिलेने अखेर पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.
🟥 गुन्हा दाखल, एक अटकेत
या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), २३८, ६१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला बसरिन शेख हिला अटक करण्यात आली असून तिचा प्रियकर राम कजेवाड सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
🟥 पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय करत असून, घटनेमागील सर्व पैलूंचा बारकाईने तपास सुरू आहे.
🟥 संतापाची लाट
प्रेमसंबंधासाठी एका मातेने स्वतःच्या लेकराचाच बळी घेतल्याची ही घटना समोर आल्यानंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुणे आणि बीड जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.



