खेड (प्रतिनिधी):
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि John Deere इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्धी प्रकल्पांतर्गत सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून वाकळवाडी (ता. खेड) येथे गेल्या काही वर्षांत विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. सन २०१९ पासून आजपर्यंत सुमारे १ कोटी रुपयांच्या निधीतून गावाचा सर्वांगीण कायापालट करण्यात आला असून वाकळवाडी आज आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी औजारे, स्प्रिंकलर आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शेततळ्यांसाठी ७० पाणी फिल्टर बसविण्यात आल्याने शाश्वत जलव्यवस्थापन साध्य झाले आहे. यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लघुउद्योजकांना कुक्कुटपालनासाठी मदत करण्यात आली असून अनेक कुटुंबांना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकळवाडी आणि ठाकरवाडी येथे कंपाऊंड वॉल, पेव्हिंग ब्लॉक, १७ संगणकांची अत्याधुनिक लॅब, स्मार्ट इंटरॅक्टिव बोर्ड, एलईडी टीव्ही, अतिरिक्त शिक्षक, पाणी फिल्टर, बेंचेस, स्वच्छतागृह तसेच नवीन वर्गखोली उभारण्यात आली आहे. या सुविधांमुळे शाळा आदर्श आणि मॉडेल शाळा म्हणून पुढे आली असून जिल्ह्यातील २६ मॉडेल शाळांनाही मागे टाकल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सीएसआर अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट व John Deere इंडिया प्रा. लि. यांचे वरिष्ठ अधिकारी वाकळवाडी येथे भेटीस आले होते. ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी शाळांमध्ये श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रगतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शाळेची गुणवत्ता आणि गावातील झालेला विकास पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंच नरेंद्र वाळुंज, उपसरपंच शिवराज्ञी धर्मराज पवळे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली खुशाल पवळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर वाळुंज, उपाध्यक्ष नाजुका पडवळ, ठाकरवाडी समितीचे अध्यक्ष सुरेश भालेकर, उपाध्यक्ष राणी पडवळ, मुख्याध्यापक नंदकुमार सुतार, पंडीत वाघुले, शांताराम रघतवान, नयनकुमार मोरे, अर्चना कड, सुबोध पवळे, दिलीप सुके यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज पवळे यांनी केले, तर योगेश पवळे यांनी आभार प्रदर्शन केले.



