दिलीपराव वळसे-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ३ कोटी ४७ लाख ८८ हजारांचा निधी मंजूर
डिंभे (ता. आंबेगाव) : आंबेगाव तालुक्यातील डिंभे, श्री क्षेत्र भीमाशंकर तसेच परिसरातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिंभे येथे नवीन ३३/११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी तब्बल ३ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांनी या प्रश्नासाठी शासन आणि महावितरण स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे, भीमाशंकर आणि परिसरातील अनेक गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीज खंडित होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकरी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसत होता. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्राची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीचा पाठपुरावा दिलीपराव वळसे-पाटील यांनी केल्याने या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला आता प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पांतर्गत ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच सबस्टेशन मॉनिटरिंग यंत्रणा, ३३ केव्ही व ११ केव्ही वीज वाहिन्या, नदी ओलांडणीची कामे, कॅपॅसिटर बँक आणि विशेष ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे परिसरातील वीज वितरण व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
या उपकेंद्रामुळे शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होण्यास मदत होणार असून, गावागावांतील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. शेतकरी, लघुउद्योजक, व्यावसायिक, स्थानिक नागरिक यांच्यासह श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष पाठपुरावा महत्त्वाचा असतो. डिंभे येथील नवीन वीज उपकेंद्राला मिळालेली मंजुरी ही आंबेगाव तालुक्याच्या वीजवितरण व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. आता या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित होण्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
डिंभेच्या वीजप्रश्नावर महत्त्वाचे पाऊल; आता शेतकरी आणि ग्रामस्थांना सुरळीत वीजपुरवठ्याची अपेक्षा!
डिंभेच्या वीजप्रश्नाला मोठा दिलासा! नवीन ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राला प्रशासकीय मंजुरी
[ngd-single-post-view]



