वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याला सलाम; शिवबा संघटनेतर्फे ५१ ‘कर्तव्याच्या काठ्या’ भेट

[ngd-single-post-view]

गणेशोत्सव व विसर्जन काळातील उत्कृष्ट नियोजनाबद्दल शिरूर पोलिसांचा सन्मान
शिरूर : गणेशोत्सव तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा शिवबा संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. पोलिसांच्या कर्तव्याला सलाम म्हणून संघटनेतर्फे ५१ ‘कर्तव्याच्या काठ्या’ भेट देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या काळात शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. गणेश मंडळांच्या मिरवणुका, विसर्जन सोहळा, वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असते. या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कर्तव्याचे शिवबा संघटनेच्या वतीने कौतुक करण्यात आले.
यावेळी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम आणि पोलीस अंमलदार सचिन गोरे यांना ‘कर्तव्याच्या काठ्या’ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. पोलिसांच्या कर्तव्याचे प्रतीक म्हणून देण्यात आलेल्या या काठ्यांमागे त्यांच्या सेवेला नागरिकांकडून दिलेली आदराची पावती असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गणेशोत्सव आणि विसर्जन काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येत असल्याने वाहतूक नियंत्रण, गर्दीचे नियोजन, मिरवणुकींचे व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करावा लागतो. अनेकदा सण-उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या सेवाभावाची दखल घेत शिवबा संघटनेने हा उपक्रम राबविला.
यावेळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कार्याबद्दलही शिवबा संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. गणेशोत्सव व विसर्जन काळात पोलिस प्रशासनाने केलेले नियोजन, बंदोबस्ताची आखणी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली मेहनत याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले.
“सण-उत्सव नागरिक आनंदाने साजरे करतात; मात्र या उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या जबाबदारीने काम करतात. त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमामुळे पोलिस कर्मचारी आणि नागरिक यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. पोलिसांच्या कर्तव्याला सलाम करत शिवबा संघटनेने केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


Websites Views :

page counter