शिरूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार; एकाचा मृत्यू

[ngd-single-post-view]

दोन लाख रुपयांच्या वादातून पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

शिरूर, दि. १८ सप्टेंबर २०२६ : शिरूर शहरातील लाटे आळी, आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. या घटनेत हरीश दादाभाऊ गंगावणे (वय ३४, रा. कामाठीपुरा, शिरूर) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लाख रुपये खिशातून काढल्याच्या कारणावरून आरोपी आणि हरीश गंगावणे यांच्यात वाद झाला. या वादातून रोहित रवींद्र सोनवणे याने पिस्तुलातून गंगावणे यांच्या कानामागे व मानेच्या उजव्या बाजूस गोळी झाडल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या गंगावणे यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी अजिंक्य अंकुश जगताप (वय २८) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८२८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३५१(२)(३), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५)(२७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात रोहित रवींद्र सोनवणे (रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे आणि आदित्य पवार (दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना आरोपी करण्यात आले आहे.

घटनेनंतर आरोपींच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या तीन पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेत वापरलेले हत्यार पिस्तूल असल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, सध्या हत्यार जप्त करण्यात आलेले नाही. पुढील तपास सपोनि केनेकर करीत आहेत.

टीप : वरील वृत्तातील आरोपींबाबतचे उल्लेख हे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार असून, आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.


Websites Views :

page counter