श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांच्या सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
दरवर्षी श्रावण महिन्यात देशभरातून लाखो भाविक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मा. मंत्री. आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, तहसीलदार खेड व आंबेगाव, गटविकास अधिकारी खेड व आंबेगाव, पोलीस अधिकारी, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष व सदस्य तसेच संबंधित महसूल व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
श्रीक्षेत्र भीमाशंकरची धार्मिक व पर्यटनदृष्ट्या असलेली महत्त्वपूर्ण ओळख लक्षात घेता, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.



