राजगुरूनगर, प्रतिनिधी : खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, खेड ग्रामीण प्रखंड, शाखा वाकी बु. यांच्या वतीने येत्या रविवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास, युवकांमध्ये क्रीडा संस्कृतीचा प्रसार, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत १७ वर्षांखालील शालेय मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तसेच ४० किलो वजनी गटातील मुलांचे मैत्रीपूर्ण कबड्डी सामने आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ₹७,०००, ₹५,०००, ₹४,००० आणि ₹२,००० अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम देखील पार पडणार आहे.
या सर्व उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच इच्छुक नागरिकांनी स्वेच्छेने आर्थिक किंवा वस्तूरूपाने सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सहकार्य करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी समीर गारगोटे (९३०७२२२७०८), किरण जाधव (९९२२८०१७४०), स्वराज टोपे, मोहनदास गावडे (९८३४२६०१००) किंवा ऋतुराज वाडेकर (९६६५५२३९२१) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात क्रीडा, आरोग्य आणि पर्यावरण यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



