पुणे, दि. २२ जुलै : प्रतिनिधी
पिंपरी येथील D. Y. Patil Hospital विरोधात नवजात अर्भकाच्या उपचारप्रकरणी गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या ५५० ग्रॅम वजनाच्या गंभीर अवस्थेतील नवजात अर्भकाला डिपॉझिटअभावी तातडीचे NICU उपचार नाकारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.
तक्रारीनुसार, सातव्या महिन्यात जन्मलेल्या नवजात मुलीला तातडीने अतिदक्षता विभागातील (NICU) उपचारांची आवश्यकता होती. रेफरलनंतर अॅम्ब्युलन्समधून तिला संबंधित रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, ₹५० हजारांचे डिपॉझिट भरल्याशिवाय दाखल करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अर्भकाला सुमारे दोन ते तीन तास अॅम्ब्युलन्समध्येच थांबावे लागल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराकडे या प्रकरणाशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे, रेफरल नोंदी, बिलांसह अन्य महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध असून ते संबंधित प्राधिकरणांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे तसेच पिंपरी पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार करून निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णांचे अधिकार आणि वैद्यकीय नैतिकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप हे तक्रारदाराने केलेले असून त्यांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नाही. तसेच संबंधित रुग्णालयाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



