धुणं भांड्याची काम करणाऱ्या महिलेचा मुलगा झाला न्यायाधीश…!!
खेड, राजगुरूनगर येथील ऍड. मंगेश आनंद धोत्रे यांची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी निवड झाली आहे. वकिलीची सनद घेतल्यानंतर अगदी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्यांच मुळ गाव जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा असून गावाकडील कोरडवाहू शेती अल्प उत्पन्न यामुळे त्यांचे कुटुंब पोटा-पाण्यासाठी राजगुरूनगर येथे 2005 साली स्थायिक झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण हे राजगुरूनगर येथेच पूर्ण केलेले आहे.
ऍड. धोत्रे यांच्या आई धुनी भांड्याची कामे करायच्या तर वडील हे खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करतात. त्यांना एक भाऊ – बहिण असून बहीणीची नुकतीच सरकारी शिक्षिका म्हणून निवड झालेली असून त्यांचा भाऊ बँकिंग परीक्षेची तयारी करत आहे.
न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी पुण्याला जाऊन कोणताही क्लास न लावता आपल्या गावातच अभ्यास करून त्यांनी हे यश संपादित केलेले आहे, याचे श्रेय ते आपल्या law कॉलेज चे प्रा. किरण काळे सर यांना देतात. प्रा. किरण काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्यायाधीश पदाचा अभ्यास केला. तर वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावहारिक ज्ञानासाठी त्यांनी खेड येथील वकील ऍड. पुष्कराज परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला सुरुवात केली. ऍड. परदेशी सरांच्या मार्गदर्शनाखाली केवळ वकिलीचे पुस्तकी ज्ञानच नव्हे तर फौजदारी, दिवाणी, कौटुंबिक, महसू्ली अशा सर्वच क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान त्यांनी प्राप्त केले आणि याचा फायदा त्यांना न्यायाधीश पदाच्या मुलाखतीसाठी झाला.
दरम्यान, मुलाला न्यायव्यवस्थेत न्यायाधीश म्हणून योगदान देण्याची संधी मिळाल्याने आमच्यासाठी आकाश ठेंगणे झाले आहे. त्याच्या यशाचा आम्हाला मोठा आनंद आणि अभिमान आहे, अशी भावना ॲड. धोत्रे यांच्या आई – वडिलांनी व्यक्त केली.



