प्रतिनिधी – योगेश लंघे पाटील
शिरूर, दि. २० (प्रतिनिधी): ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करणाऱ्या चोरट्याला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून चोरीस गेलेले सुमारे ६ तोळे वजनाचे, अंदाजे 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्री. मच्छिंद्र सखाराम सरोदे (रा. शरदवाडी, जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे) हे नातेवाईकांसह लग्नकार्याला गेले असताना त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसलेल्या त्यांच्या आई श्रीमती लहानुबाई सखाराम सरोदे (वय ९० वर्षे) यांच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याचे दागिने एका अज्ञात इसमाने जबरीने चोरी करून नेले. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. १५१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला तातडीने आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांकडून माहिती संकलन करून तपास सुरू असताना हा गुन्हा आकाश किसन मेरगळ (वय २०, रा. पंचतळे जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे) याने केल्याची माहिती मिळाली.
प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी आकाश मेरगळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सहा तोळे वजनाचे, अंदाजे 9.00000/रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, दादाराव नागरे, भाऊसाहेब ठोसरे, शंकर बल्लाळ यांनी केली.



