🗞️ प्रतिनिधी- योगेश लंघे पाटील
शिरूर, दि. ७ (वार्ताहर):
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत मंगळवारी (दि. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विविध मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत लोकशाहीवरील आपला ठाम विश्वास पुन्हा अधोरेखित केला.
तालुक्यात एकूण ७५.५९ टक्के मतदान झाले असून २ लाख २८ हजार ११३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख १८ हजार ६८५ पुरुष, १ लाख ९ हजार ४२२ महिला तसेच ६ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक संपली, वैरही संपले पाहिजे
निवडणुकांच्या काळात काही ठिकाणी हेतुपुरस्सर अफवा, कानभरणी, जुने वाद उकरून काढण्याच्या प्रवृत्ती दिसून येतात. काही तथाकथित खबरी व गटबाजीमुळे गावकीतील जीवाभावाचे संबंध ताणले जातात. यामुळे विकासाऐवजी वादांची बीजे पेरली जातात आणि त्याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसतो.
निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. निकाल काहीही लागो, निवडणूक संपल्यानंतर वैरही संपले पाहिजे, हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत असल्याचे जाणकारांचे मत आहे. गाव व गावकरी हेच अंतिम सत्य असून, स्वच्छ प्रशासन, सर्वांगीण विकास व सामाजिक सलोख्यासाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येण्याची गरज आहे.
महिला मतदारांचा वाढता सहभाग
या निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. अनेक मतदान केंद्रांवर महिलांचे मतदान ७२ टक्क्यांहून अधिक राहिले, तर काही ठिकाणी महिलांचा टक्का पुरुषांच्या जवळपास समान दिसून आला. ग्रामीण लोकशाहीसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.
प्रशासनाचा चोख बंदोबस्त
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली होती. तालुक्यात
३७१ मतदान केंद्राध्यक्ष,
१,११३ मतदान अधिकारी,
३७१ शिपाई,
३७१ पोलीस शिपाई
यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यास सक्त बंदी घालण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळगत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.
तालुक्यातील गटनिहाय मतदान टक्केवारी
टाकळी हाजी – ८०.७४%
कवठे येमाई – ७५.९९%
न्हावरे – ७२.६९%
शिरूर ग्रामीण – ७५.०१%
रांजणगाव गणपती – ८१.३७%
कारेगाव – ८०.८५%
पाबळ – ७२.८३%
केंदूर – ७६.९४%
शिक्रापूर – ७०.६६%
सणसवाडी – ७१.७०%
तळेगाव ढमढेरे – ७५.७१%
रांजणगाव सांडस – ८१.१२%
वडगाव रासाई – ७२.१३%
मांडवगण फराटा – ७१.९७%
निकालापूर्वीची अस्वस्थ प्रतीक्षा
मतदान शांततेत पार पडले असले, तरी निकाल जाहीर होईपर्यंतची एक दिवस-एक रात्रीची प्रतीक्षा उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांसाठी तणावपूर्ण ठरणार आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागतो, हे लवकरच स्पष्ट होईल; मात्र त्यानंतर गावांतील सामाजिक सलोखा टिकतो का, हा खरा कस असणार आहे.



