प्रतिनिधी- योगेश लंघे पाटील
ता. १४ | दिल्ली प्रतिनिधी
दिल्ली येथे १३ डिसेंबर रोजी झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक मधुकर गिलबिले यांना इन्स्पायरिंग इंडियन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान पद्मभूषण व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या २२ वर्षांपासून मधुकर गिलबिले राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव स्मृती स्थळावर दररोज स्वखर्चाने पुष्पहार अर्पण करून पूजा करीत आहेत. तसेच पंजाब येथील तिन्ही हुतात्म्यांच्या समाधी स्थळांना भेटी, भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग अशा विविध सेवाभावी उपक्रमांतून त्यांनी देशभक्तीचा जागर केला आहे.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासह विविध सामाजिक उपक्रमांतील भरीव योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी गोल्डन स्पॅरो संस्थेच्या संचालिका व आकाशवाणी दिल्ली केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आरती मल्होत्रा, संस्थेचे संचालक तिलक राज अन्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे मधुकर गिलबिले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.



