राजगुरुनगर (ता. खेड) : प्रतिनिधी संपादकीय
पुणे येथे अलीकडे झालेल्या राजकीय पक्षांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीत काही पत्रकार बांधव जखमी झाले. या घटनेचा तीव्र निषेध करत खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने जखमी पत्रकारांना न्याय मिळावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
खेड तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनादरम्यान वार्तांकन करत असलेल्या पत्रकारांवर दगडफेक होणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे सांगत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, जखमी पत्रकारांना वैद्यकीय मदत व शासकीय नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आंदोलनस्थळी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा पत्रकार संघाच्या वतीने पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. निलेश आंधळे,सल्लागार वनिता कोरे, बाळासाहेब सांडभोर, महेंद्र शिंदे,उपाध्यक्ष अतुल भालेराव, सुनील थिगळे खजिनदार प्रभाकर जाधव, कायदेशीर सल्लागार सोमनाथ नवले, रोहिदास गाडगे,प्रसिद्धी प्रमुख नाजिम इनामदार, रामचंद्र सोनवणे,सदाशिव आमराळे आदी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.



