प्रतिनिधी- श्री-वैभव काळे पाटील.
चिंचवड – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) चिंचवड येथील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असल्याचा आरोप होत आहे. गेल्या चार वर्षांपासून ‘स्टाफ क्वार्टर्स’चे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असून, काम वेळेत पूर्ण न झाल्याने औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. मात्र, असे असतानाही संबंधित वादग्रस्त ठेकेदारावर MIDC अधिकाऱ्यांची विशेष मेहेरबानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामात विलंब झाल्याबद्दल दररोज पाच हजार रुपयांचा दंड ठेकेदारावर आकारला जातो. तरीदेखील कामाची गती वाढलेली नसून, दंडाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप आहे. यामुळे ‘दंड फक्त कागदोपत्रीच आहे का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
याच ठेकेदाराने यापूर्वी पत्नीच्या नावे एका कामात खोटी कागदपत्रे सादर करून MIDCची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. त्या प्रकरणात ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी, तक्रारदारावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असूनही, संबंधित ठेकेदाराला पुन्हा काम कसे देण्यात आले, हा मोठा प्रश्न आहे.
विशेष म्हणजे, खोटी कागदपत्रे देऊन काम केलेल्या काळात तसेच सध्याच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाच्या वेळीही कार्यकारी अभियंता म्हणून श्री. कोतवाड यांच्याकडेच चार्ज असल्याचे सांगितले जाते. यामुळे MIDC मधील कारभारावर गंभीर संशय निर्माण झाला असून, ‘एकाच अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात वारंवार वादग्रस्त ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे MIDC चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व औद्योगिक क्षेत्रातील घटकांकडून होत आहे.
आता या प्रकरणाकडे राज्य शासन व MIDC प्रशासन कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



