प्रतिनिधी- अँड निलेशजी आंधळे
राजगुरुनगर | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँक लि.च्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मंगळवारी (दि. १६) करण्यात आले. बँकेच्या या दिनदर्शिकेला दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहक व नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राजगुरुनगर सहकारी बँक दरवर्षी आपल्या दिनदर्शिकेतून नवीन व समाजोपयोगी संकल्पना मांडत असते. आतापर्यंत बँकेचे संचालक राजेंद्र सांडभोर यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक बँकिंग सुविधा, महाराष्ट्रातील उत्सव व परंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, विविध आजारांविषयी जनजागृती, देशाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची माहिती, ग्राहक जागरूकता, क्रांतिकारी परिवर्तन तसेच दळणवळणाच्या इतिहासातून संस्कृतीचा विकास आदी विषयांवर माहितीपूर्ण दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
यावर्षीच्या २०२६ च्या दिनदर्शिकेत ‘पारंपरिक व सौर ऊर्जा स्रोत’ या विषयावर विशेष भर देण्यात आला आहे. जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या पानांवर सौर पाणी गरम करणारी यंत्रणा, सौर चूल, सौर पॅनेल, सौर पंप, सौर स्ट्रीट लाईट, सौर होम सिस्टीम, सौर इन्व्हर्टर, सौर बॅटरी स्टोरेज, सौर पंखा व सौर एसी, सौर कारपोर्ट व ई-चार्जिंग स्टेशन, सौर वाहने तसेच सौर ट्रॅकिंग सिस्टीम यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, विजयाताई शिंदे, राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, राहुल तांबे, रामदास धनवटे, समीर आहेर, सचिन मांजरे, धर्मेंद्र खांडरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, सरव्यवस्थापक संजय ससाणे, अमृत टाकळकर, दिलीप मलघे, मंजीद महिंदर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक जिरण शिंदे, शिवाजीराव गव्हाणे, बँकेचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक राजेंद्र सांडभोर यांनी केले, तर उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना अध्यक्ष सागर पाटोळे म्हणाले, “दरवर्षी बँकेच्या माध्यमातून समाजोपयोगी संकल्पना दिनदर्शिकेतून मांडल्या जातात. यंदा पारंपरिक व सौर ऊर्जा स्रोत, त्यांची उपकरणे आणि उपयोग याबाबत माहिती देण्यात आली असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढावा, हा मुख्य उद्देश आहे.”
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये नवीकरणीय ऊर्जेबाबत जनजागृती होण्यास निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



