कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन १५ फेब्रुवारीला राजगुरुनगर येथे

[ngd-single-post-view]

 

राजगुरुनगर | दि.12फेब्रुवारी २०२६

कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन ढसाळ यांच्या जयंतीदिनी, रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नीलकमल लॉन्स, पुणे–नाशिक रोड, राजगुरुनगर येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे भूषविणार आहेत.

ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म. भा. चव्हाण हे परिसंवादप्रमुख असून, कविसंमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे असणार आहेत. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे हे स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी संमेलनास शुभेच्छा संदेश दिला असल्याचेही टाव्हरे यांनी सांगितले. संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, काव्यसंमेलन व गुणवंतांचा सन्मान असे विविध साहित्यिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यापूर्वी दि. १५/०२/२०२४ रोजी कनेरसर येथे पहिले, तर दि. १५/०२/२०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे दुसरे साहित्य संमेलन यशस्वीरीत्या पार पडले होते.

नामदेवराव ढसाळ यांचा जन्म पुर (ता. खेड) येथे झाला असून, त्यांचे शालेय शिक्षण कनेरसर येथे झाले. उपजीविकेसाठी ते मुंबईत गेले आणि तीच त्यांची कर्मभूमी ठरली. साहित्य क्षेत्रात तसेच दलित पँथर चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अलौकिक योगदान दिले. जागतिक पातळीवर त्यांची विश्वसाहित्यिक म्हणून ओळख आहे.

भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले असून, साहित्य अकादमी पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. विद्रोही कवी व लेखक म्हणून त्यांची गणना होते. गोलपिठा या पहिल्या काव्यसंग्रहास राज्य शासनासह अनेक पुरस्कार लाभले. हाडकी हाडवळा, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, गांडू बगीचा, तुही यत्ता कंची?, मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले, या सत्तेत जीव रमत नाही, प्रियदर्शनी, खेळ आदी विपुल साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली आहे.

खेड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक व साहित्यप्रेमींनी ढसाळांचा वारसा जतन करण्यासाठी आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अशोकराव टाव्हरे यांनी केले आहे.


Websites Views :

page counter