खेड (वार्ताहर):- संपादकीय.
.खेड तालुक्याच्या राजकारणात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी अनेक अर्थपूर्ण आणि दूरगामी संकेत दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची लाट दिसत असताना, तब्बल ५२ जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊनही खेड तालुक्यात मात्र चित्र वेगळेच पाहायला मिळाले. येथे बाबाजी काळे यांनी आपला राजकीय गड अभेद्य राखत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वर्चस्व कायम ठेवले.
ही बाब केवळ पक्षीय विजयापुरती मर्यादित नसून, बाबाजी काळे यांच्या स्थानिक नेतृत्वातील करिष्मा, कार्यकर्त्यांवरील पकड आणि जमिनीवरची संघटनशक्ती यांची ठळक साक्ष देणारी ठरली आहे.
आकड्यांतून दिसणारे वास्तव
खेड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी शिवसेना (उबाठा) गटाचे ५ सदस्य विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ३ जागांवर समाधान मानावे लागले. पंचायत समितीवरही पुन्हा एकदा भगवा फडकला.
विशेष म्हणजे, अलीकडील नगरपरिषद निवडणुकांमध्ये काहीसा दुर्लक्षित राहिलेला शिवसेना (उबाठा) गट यावेळी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आणि अपेक्षेपेक्षा अधिक दमदार कामगिरी करत पुन्हा आपले अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले.
खेडच्या रणांगणात सरदार विजयी, सेनापती जखमी
मात्र, या यशाच्या जल्लोषामागे एक वेदनादायी वास्तवही लपलेले आहे. “गड आला, पण सिंह गेला” ही म्हण खेडच्या निकालांवर तंतोतंत बसणारी ठरते. समर्थक उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, आमदार बाबाजी काळे यांच्या बहिणीचा निसटता पराभव हा धक्का देणारा ठरला. मतमोजणी केंद्रावर एकाच वेळी आनंद आणि वेदना—राजकारणातील विजय-पराभवाच्या दोन बाजू—ठळकपणे पाहायला मिळाल्या.
काळेंचा गड कायम, पण राजकारण नव्या वळणावर
या निवडणुकांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले स्थानिक सरदार, मनसबदार आणि कार्यकर्त्यांचे स्वतंत्र प्रभावक्षेत्र. प्रत्येकाने आपापला गड राखत पुढील काळात खेड तालुक्यात नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
ही परिस्थिती इतिहासातील पेशवाई काळाची आठवण करून देणारी आहे—जिथे पेशव्यांची ताकद होळकर, शिंदे, गायकवाड, आंग्रे, दाभाडे यांसारख्या सरदारांच्या सैन्यावर अवलंबून होती. प्रत्येक सरदाराचा स्वतःचा मुलुख आणि स्वतःची ताकद होती.
आज खेडच्या राजकारणातही तशीच परिस्थिती निर्माण होते आहे का? हे स्थानिक सुभेदार एकत्रित ताकद म्हणून काम करतील की स्वतंत्र राजकीय गणिते मांडतील—यावरच खेड तालुक्याची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.
सध्याचा निकाल हा केवळ विजय-पराभवाचा आकडा नसून, भविष्यातील राजकीय संघर्षांची नांदी ठरू शकतो, हे मात्र नक्की.



