आळंदी (प्रतिनिधी) :
पुणे जिल्ह्यातील धानोरे गावाच्या हद्दीत पोलिसांनी धाडसी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन विधिसंघर्षित बालकांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी ते मरकळ मार्गावरील पॉलिबॉड कंपनीसमोर १० एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संबंधित टोळी रस्त्यालगत दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ सापळा रचून छापा टाकला आणि आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
महंमद इब्राईम अनिस चौधरी (वय १९, रा. कुदळवाडी, चिखली),
जिशान महंमद सहिर सय्यद खान (वय १८, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी),
जमाल आशिक अली हाशमी (वय १९, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी),
शिवकुमार निरंजन चौव्हाण (वय १८, रा. कुदळवाडी) आणि
सलमान जुबैर बागवान (वय १८, रा. चिखली).
पोलिसांनी या टोळीकडून नऊ मोबाईल, चार लोखंडी कोयते, एक छोटा हत्ती वाहन, तीन दुचाकी आणि नायलॉन दोरी असा एकूण ८ लाख ४४ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी तरुण व अल्पवयीन असल्याने तरुणांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



