(प्रतिनिधी | पुणे / खेड)
पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, भाजप नेते शरद बुट्टे पाटील यांनी मध्यरात्री उशिरा पालकमंत्री अजित दादा पवार यांची सपत्नीक भेट घेतल्याची माहिती समोर आली असून, या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने झाल्याचे बोलले जात असून, यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची अनुपस्थिती असल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
याआधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शरद बुट्टे पाटील यांच्या भूमिकेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. आता मात्र “कमळाला जय श्रीरामचा नारा देत हातात घड्याळ बांधण्याची” अर्थात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे वाटचाल होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शरद बुट्टे पाटील हे अनुभवी नेते असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर भाजप अशी राजकीय वाटचाल केली आहे. यापूर्वी त्यांनी भाजपकडून विधानसभेची निवडणूक देखील लढवली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील निर्णय स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारा ठरू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, या भेटीबाबत अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी पुणे जिल्ह्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत त्यांचा तसेच त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.



