शिरूर (प्रतिनिधी) :- योगेश लंघे पाटील
मोबाईल फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून एका तरुणावर चौघा इसमांनी अमानुष मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 911/2025 अन्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी किरण सावळा फुलारे (वय 23, व्यवसाय नोकरी, रा. आंधळगाव ता. शिरूर जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जाधव (मो. 8626031005) व अन्य तीन अनोळखी इसमांविरुद्ध BNS कलम 118(1), 115(2), 351(2)(3), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास, मौजे शिरूर गावच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या सुनील वडेवालेजवळ घडली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मोबाईल सायकल फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी जाधव याने फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली फोडून गंभीर दुखापत केली, तर एका अनोळखी इसमाने दगडाने उजव्या खांद्यावर मारून जखमी केले.
या प्रकरणी जखमी स्वतःच फिर्यादी असून उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम पो. हवा. 2185 सुद्रीक यांनी केले असून तपास पो. हवा. भगत (98) करत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून फायनान्सच्या नावाखाली होणाऱ्या दादागिरीविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.



