— प्रतिनिधी, पुणे/नाशिक -योगेश लंघे पाटील
बैठकांवर बैठका; नाशिकपासून प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी
पुणे–नाशिक रेल्वे महामार्ग (Pune–Nashik Railway Corridor) हा महत्त्वाकांक्षी सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प दुसऱ्या मार्गांवर वळवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, तो पुन्हा पुणे–नाशिक मार्गावरच प्रत्यक्षात यावा यासाठी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या पुढाकारातून सलग बैठकांचा धडाका सुरू असून, नाशिकचे खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नाशिकपासून प्रत्यक्ष आंदोलनाची फील्डिंग लावून प्रकल्पातील प्रशासकीय व तांत्रिक अडथळे दूर करण्यावर भर दिला जात आहे. स्थानिक जनतेच्या भावना, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जिल्ह्यांच्या विकासाशी संबंधित मुद्दे या बैठकींत ठामपणे मांडले जात आहेत.
हा सुमारे २३५.१५ किमी लांबीचा प्रस्तावित प्रकल्प Maharashtra Rail Infrastructure Development Corporation (MAHARAIL) मार्फत विकसित केला जात असून, २०० किमी/तास वेगाने धावणाऱ्या गाड्यांमुळे पुणे–नाशिक प्रवासाचा वेळ २ ते २.५ तासांपर्यंत कमी होणार आहे. भविष्यात या मार्गावर २५० किमी/तास वेगाची क्षमता ठेवण्यात आली आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
अंतर: सुमारे २३५.१५ किमी
वेग: २०० किमी/तास (भविष्यात २५० किमी/तास)
प्रवासाचा वेळ: अंदाजे २ ते २.५ तास
स्टेशन्स: सुमारे २४ प्रस्तावित
बोगदे: १८
संबंधित जिल्हे: पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर) व नाशिक
मार्ग व सद्यस्थिती
GMRT (Giant Metrewave Radio Telescope) प्रकल्पाच्या परिसरामुळे मार्गात काही बदल सुचवण्यात आले असून, शिर्डी मार्गे सुधारित संरेखन प्रस्तावित आहे. जमीन संपादनास सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आक्षेपांमुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र, नाशिक रोड ते साईनगर शिर्डी दरम्यान दुहेरी मार्गाच्या डीपीआरला मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाला काही प्रमाणात गती मिळाली आहे.
महत्त्व
या प्रकल्पामुळे पुणे–नाशिक दरम्यान औद्योगिक व व्यावसायिक देवाणघेवाण वाढणार असून, शिर्डीसारख्या धार्मिक स्थळांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.



