प्रतिनिधी-श्री योगेश लंघे पाटील
शिरूर तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका ठरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करत त्यास कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या नगरपालिका, नगरपरिषद तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सराईत व धोकादायक गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अवैध शस्त्र बाळगणारे, महिलांविरोधातील गुन्हे करणारे, वाळू तस्कर, जबरी चोरी, दरोडा, खंडणी व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोलेगाव रोड परिसरात राहणारा दिपक बबन गुंजाळ (वय ३३), रा. वासल्य हॉस्पिटल शेजारी, शिरूर, याच्याविरोधात यापूर्वी बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे असे एकूण तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सराईत व धोकादायक असल्याने त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी दिपक बबन गुंजाळ याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या कृत्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड व धोकादायक व्यक्ती प्रतिबंध अधिनियम, १९८१ (सुधारित अधिनियम २०२५) अन्वये दिनांक १२/१२/२०२५ रोजी स्थानबद्धतेचा आदेश पारित केला.
या आदेशानुसार शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत दिपक बबन गुंजाळ यास दिनांक १३/१२/२०२५ रोजी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल करण्यात आले.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक मा. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदारांनी विशेष सहभाग घेतला.
– जनसंपर्क अधिकारी,
पुणे ग्रामीण पोलीस, पुणे



