ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड शहराचा विकास राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सर्वाधिक झाला :: संजो

28/03/2022 23:02:28  90   उज्वल पाटील

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास झाला. मात्र भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेत केवळ भ्रष्टाचार आणि लाचखोरीला उधाण आल्याने शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. शहराच्या विकासाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक 30, पिंपरीगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंगी संजोग वाघेरे पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी, प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषाताई वाघेरे, नगरसेवक श्याम लांडे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य फजल शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, चर्मकार महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना वाघेरे-पाटील म्हणाले, 2002 ते 2017 या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. या 15 वर्षांच्या काळात शहराची प्रगती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाली. देशातील सर्वात वेगाने विकासीत होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची देशपातळीवर ओळख निर्माण झाली. शहरातील प्रत्येक घटकाचा विकास हे राष्ट्रवादीचे नेहमीच उद्दीष्ट राहिले आहे. मात्र, भाजपाने गतवेळी अत्यंत फसवी आश्वासने देऊन सत्ता पदरात पाडून घेतली. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाऐवजी स्वत:च्या विकासाचे ध्येय भाजपाच्या नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी ठेवल्याने शहराच्या विकासाची गती खुंटली आहे.

पाणीपुरवठ्यापासून रस्ते, कचरा, आरोग्य अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवून पुन्हा शहराला विकासाच्या पुर्वपदावर घेऊन जाण्याची धमक केवळ राष्ट्रवादीमध्येच आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाफिल न रहाता आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. शहराच्या विकासासाठी जनतेनेही राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहनही वाघेरे पाटील यांनी यावेळी केले.