ब्रेकिंग न्यूज

भामा आसखेड धरण येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

18/03/2022 23:54:14  329   अँड. निलेश आंधळे

चाकणजवळील बिरदवडी येथील कुटुंबातील सदस्य होळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुण-तरुणीचे शिवे भागातील भामा आसखेड धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भामा आसखेड धरणात बुडून मृत्यु झाल्याची दुःखद घटना पहिल्यांदाच घडली आहे.

रोहन रोकडे ( वय.२४ वर्षे, सध्या रा. बिरदवडी, मूळ रा. जुन्नर) आणि प्राजक्ता पवार ( वय.२० वर्षे, रा. बिरदवडी ) हे दोघे आपल्या कुटुंबासह धुलिवंदनच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरील शिवे गावच्या हद्दीत फिरायला गेले होते. रोहन, प्राजक्ता यांच्यासह चोघे जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज आला नसल्याने रोहन, प्राजक्ता आणि एक महिला असे तिघे जण खोल पाण्यात बुडू लागले, मात्र पाण्यात उतरलेल्या चौघांपैकी बारा तेरा वर्षाच्या मुलाला पोहता येत असल्याने त्याने महिलेला बाहेर काढले मात्र रोहन आणि प्राजक्ता वयाने मोठे असल्याने त्यांना पाण्याबाहेर काढणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच शिवे गावातील तरुणांनी धरणाकडे धाव घेऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. स्थानिक तरुणांनी पाण्यात उतरून रोहनला शोधून पाण्याबाहेर काढले. तर वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा येथील सदस्यांनी काही तासाच्या अथक परिश्रमानंतर धरणातून प्राजक्ताला शोधून काढण्यात यश मिळवले.