राजगुरुनगर जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील चंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांची भीमा नदीत उडी मारून आत्महत्या....
कारण मात्र अद्याप अस्पष्ट !!
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात गेली तीस वर्ष काम करणारे ज्येष्ठ वकील चंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांनी आज दुपारी केदारेश्वर येथील बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ते राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे वडील कोंडीभाऊ टाकळकर हे खेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खेड तालुक्यातील पायाभरणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता. काही दिवसांपूर्वी हृदयरोगाचा झटका आल्याने मयत झालेले महावीर उर्फ मुन्ना पारख वकील हे त्यांचे जवळचे मित्र होते.
त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. ते अतिशय अभ्यासू, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. तसेच समाजकारण व राजकारणात त्यांचा वावर असे. त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई, वडील, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने वकिली क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे.